S. K. Patil Sindhudurg College in Malvan celebrated Reading Inspiration Day in memory of Dr. A. P. J. Abdul Kalam, encouraging students to read more and make greater use of the library.
सिंधुदुर्ग महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याला अभिवादन
मालवण (प्रतिनिधी) : वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी महान व्यक्तींची चरित्रे आवर्जून वाचावीत, तसेच ज्ञानवर्धनासाठी महाविद्यालयातील ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे प्रतिपादन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी केले.
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करणे, हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात ग्रंथपाल संग्रामसिंह पवार यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनप्रवासाचा परिचय करून देत त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा घेतला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य राबते यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व विशद केले. नियमित वाचनामुळे विचारशक्ती विकसित होते, ज्ञानात भर पडते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील पुस्तकांबरोबरच थोर व्यक्तींची चरित्रे आणि वैचारिक साहित्याचेही वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. हसन खान यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचे भारतीय संरक्षण क्षेत्रातील मोलाचे योगदान विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून, कार्यनिष्ठेतून आणि प्रेरणादायी जीवनप्रवासातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.
या निमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात रहस्यकथा, भयकथा आणि कादंबऱ्यांचे विशेष पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच डॉ. अब्दुल कलाम यांनी लिहिलेली आणि त्यांच्या जीवनावर आधारित विविध पुस्तकेही प्रदर्शनात मांडण्यात आली होती. या ग्रंथप्रदर्शनाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भेट देऊन पुस्तकांचा लाभ घेतला.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध साहित्यप्रकारांची ओळख झाली. ज्ञानार्जनासाठी वाचनाची सवय जोपासण्याचा संदेश देत महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.










