लेव्हल १ परीक्षेत ५० पैकी ५० गुण; विष्णू कोरगांवकर यांच्यासह दोघांनाही ‘अ’ श्रेणी
मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या वतीने सांगली येथे आयोजित टेबल टेनिस प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण शिबिर व परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशिक्षकांनी घवघवीत यश संपादन केले आहे. मालवणचे प्रशिक्षक महेश तळवडेकर यांनी लेव्हल १ परीक्षेत ५० पैकी ५० गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर महेश तळवडेकर आणि विष्णू कोरगांवकर या दोन्ही प्रशिक्षकांनी लेव्हल १ व लेव्हल २ परीक्षा ‘अ’ श्रेणीत उत्तीर्ण होत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आणि सूरज फाउंडेशन, सांगली यांच्या सहकार्याने १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत नवकृष्णा व्हॅली गुरुकुल, सांगली येथे तीन दिवसीय प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील टेबल टेनिस प्रशिक्षकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव यतीन टिपणीस यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
या प्रशिक्षण शिबिरात टेबल टेनिसमधील तांत्रिक कौशल्ये, आधुनिक प्रशिक्षण पद्धती, खेळाडूंचा शारीरिक व मानसिक विकास, खेळाचे नियम, स्पर्धात्मक दृष्टिकोन आणि प्रभावी प्रशिक्षण नियोजन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षकांचे तांत्रिक ज्ञान अद्ययावत करणे, त्यांची व्यावसायिक गुणवत्ता वाढविणे आणि राज्यात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या सक्षम प्रशिक्षकांची फळी निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या परीक्षेत महेश तळवडेकर यांनी लेव्हल १ मध्ये शंभर टक्के गुण मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले. त्याचबरोबर विष्णू कोरगांवकर यांनीही ‘अ’ श्रेणी मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. दोन्ही प्रशिक्षकांनी लेव्हल १ आणि लेव्हल २ या दोन्ही परीक्षा ‘अ’ श्रेणीत उत्तीर्ण केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
या यशाबद्दल महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे सचिव हेमंत वालकर, असोसिएशनचे पदाधिकारी आणि मालवणमधील टेबल टेनिसप्रेमींनी महेश तळवडेकर व विष्णू कोरगांवकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दोन्ही प्रशिक्षकांच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात टेबल टेनिसच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना आधुनिक तंत्रावर आधारित शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळण्यास मदत होणार असून, जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षमपणे तयार करण्याच्या दृष्टीने हे यश महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Malvan’s Mahesh Talwadekar scores a perfect 50 out of 50 to secure first rank in the Maharashtra Level 1 table tennis coaching exam. Vishnu Korgaonkar and Talwadekar both earn Grade A in Level 1 and Level 2.












