भात कापणीपासून आंबा-काजू बागांच्या व्यवस्थापनापर्यंत मार्गदर्शन; मेघगर्जना आणि विजांपासून बचाव करण्याचेही आवाहन
सिंधुदुर्ग, दि. २७ ऑक्टोबर : जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि पुढील दिवसात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीचा साप्ताहिक कृषी सल्ला जाहीर केला आहे. भात पिकाची काढणी, आंबा-काजू बागांचे व्यवस्थापन, रब्बी पिकांची पेरणी आणि पशुधनाची काळजी याबाबत विद्यापीठाने मार्गदर्शन केले आहे.
भात कापणी करताना काळजी घ्या
तयार झालेल्या हळव्या भात पिकाची ९० टक्के दाणे पिकल्यानंतर सकाळच्या वेळी जमिनीलगत कापणी करावी. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये, यासाठी जेवढ्या भाताची झोडणी करणे शक्य आहे तेवढ्याच क्षेत्राची कापणी करावी. कापलेले भात शेतात न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
निमगरव्या आणि गरव्या भात जाती सध्या दाणे भरण्याच्या किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. पिकावरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) या विद्राव्य खताची एक टक्का, म्हणजेच प्रति लिटर पाण्यात १० ग्रॅम या प्रमाणात फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गरजेनुसार विहीर, नदी किंवा नाल्यांमधून संरक्षित पाणी द्यावे.
आंबा-काजू बागांचे व्यवस्थापन
ढगाळ आणि दमट वातावरणात आंब्यावरील तुडतुडे किडीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने डेल्टामेथ्रिनच्या फवारणीची शिफारस केली आहे. शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास बाधित शेंडे नष्ट करून शिफारशीनुसार कीटकनाशकांचा वापर करावा. काजूवरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेबची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
फवारणीपूर्वी संबंधित औषधाचे लेबल, पीकनिहाय शिफारस आणि सुरक्षित वापराच्या सूचना तपासाव्यात. फवारणीनंतर किमान पाच ते सहा तास पावसाची उघडीप मिळेल, याचा अंदाज घेऊन सकाळच्या वेळी फवारणी करावी. द्रावणात स्टीकर किंवा स्प्रेडर वापरण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे.
कुळीथ आणि वाल पेरणीला प्राधान्य
हळव्या भाताची काढणी पूर्ण झालेल्या क्षेत्रात जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी कुळीथ आणि कडवा वाल या पिकांची शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागत पद्धतीने त्वरित पेरणी करावी. तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करताना शिफारशीत पद्धतीचे पालन करावे.
शेंगा लागण्याच्या अवस्थेतील भुईमुगावर मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यास तसेच टिक्का रोगाची लक्षणे दिसल्यास विद्यापीठाच्या शिफारशीनुसार उपाययोजना कराव्यात. ऊस आणि हळद पिकांना पाण्याची उपलब्धता असल्यास गरजेनुसार सिंचन करावे. काढणीस तयार असलेल्या झेंडू, वेलवर्गीय आणि फळभाज्यांची लवकर काढणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जनावरे आणि कुक्कुटपालनाची काळजी घ्या
सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता लक्षात घेऊन जनावरांना उघड्यावर किंवा झाडाखाली न बांधता सुरक्षित गोठ्यात ठेवावे. कुक्कुटपालन शेडमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वाढवावी आणि गरजेनुसार बाहेरील बाजूला कापडी पडदे लावावेत.
विजांपासून बचावासाठी ‘दामिनी’ ॲप वापरा
मेघगर्जना आणि वीज पडण्याचा धोका लक्षात घेऊन भारतीय हवामानशास्त्र विभागाचे ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतात असताना सुरक्षित निवारा उपलब्ध नसल्यास झाडाखाली किंवा उंच वस्तूंजवळ थांबू नये. ट्रॅक्टर, धातूची शेती उपकरणे आणि विद्युत यंत्रणांपासून दूर राहावे. शक्य तितक्या लवकर सुरक्षित इमारतीत किंवा बंद वाहनात आसरा घ्यावा.
दुष्काळसदृश परिस्थिती आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पिकांची अवस्था, जमिनीतील ओलावा आणि स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे.











