कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणि रेबीज प्रतिबंधासाठी नगरपरिषदेची मोहीम; नागरिकांना सहकार्याचे आवाहन
मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासह नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मालवण नगरपरिषदेने निर्बीजीकरण व लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात २०० भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण पूर्ण करण्यात आल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली.
नगराध्यक्षा ममता वराडकर आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. वार्षिक निविदा प्रक्रियेद्वारे नागपूर येथील ‘सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन’ या संस्थेची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण आणि लसीकरणाची कार्यवाही केली जात आहे.
भटक्या कुत्र्यांची अनियंत्रित वाढ रोखणे, कुत्र्यांच्या हल्ल्यांचा धोका कमी करण्यास मदत करणे आणि रेबीजसारख्या गंभीर आजारांचा प्रसार रोखणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्देश आहेत. निर्बीजीकरणामुळे कुत्र्यांच्या संख्येवर दीर्घकालीन नियंत्रण मिळविण्यास मदत होते, तर लसीकरण सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
पहिल्या टप्प्यात २०० कुत्र्यांवर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यांतही ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू ठेवण्याचे नगरपरिषदेचे नियोजन आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तात्पुरते उपाय करण्याऐवजी शास्त्रीय पद्धतीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून नियंत्रण मिळविण्यावर प्रशासनाचा भर आहे.
दरम्यान, नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे आणि भटक्या कुत्र्यांबाबतच्या समस्या नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नगरपरिषदेच्या १८००२३३४३८१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.











