हरी खोबरेकर यांची भूमिका; मच्छिमारांवर गुन्हे दाखल केल्याचा निषेध, प्रसंगी आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा
मालवण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मिठमुंबरी-बागवाडी येथील जेटीवर प्रस्तावित कायाकिंग प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादाला आता राजकीय पाठबळ मिळाले आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक पारंपरिक मच्छिमार आणि ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केल्याचा निषेध करत ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी त्यांच्या जेलभरो आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. प्रसंगी ठाकरे शिवसेनाही या आंदोलनात सहभागी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मिठमुंबरी-बागवाडी येथे कायाकिंग प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी स्थानिक मच्छिमार आणि ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी काही स्थानिक मच्छिमार व ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थ आणि पारंपरिक मच्छिमारांनी पोलिसांना निवेदन देत, आपल्याला धमकावणाऱ्या संबंधित बाहेरील व्यक्तींविरोधात चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात दोन दिवसांत संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हरी खोबरेकर यांनी मच्छिमारांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.
कायाकिंग प्रकल्पामुळे स्थानिक मच्छिमारांच्या पारंपरिक व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्यांचा विरोध रास्त असल्याचे खोबरेकर यांनी म्हटले आहे. केवळ प्रकल्पाला विरोध केला म्हणून मच्छिमारांना धमकावणे ही गंभीर बाब असून, आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या मच्छिमारांवर गुन्हे दाखल करणे निषेधार्ह असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
“ठाकरे शिवसेना स्थानिक मच्छिमारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यांच्या जेलभरो आंदोलनाला आमचा पाठिंबा असून, गरज पडल्यास आम्हीही या आंदोलनात सहभागी होऊ,” असे हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केले.











