हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे आयोजन; बालगटासह खुल्या गटासाठी आकर्षक रोख पारितोषिके
मालवण (प्रतिनिधी) : ‘जयजयकार श्रीकृष्णाचा, वधी नरकासुराचा…’ या संकल्पनेतून मालवणात शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा २०२६ रंगणार आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्या वतीने भरड नाका येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बालगोपाळांसह महिला आणि पुरुषांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांची नव्या पिढीला ओळख व्हावी, पारंपरिक वेशभूषेला प्रोत्साहन मिळावे आणि कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे.
स्पर्धेच्या आयोजनासाठी झालेल्या नियोजन बैठकीत भाऊ सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेची रूपरेषा निश्चित करण्यात आली. यावेळी राजू बिडये, बंटी केनवडेकर, अनिकेत फाटक, हरेश पडते, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजक म्हणून अमित खोत, तर सहसंयोजक म्हणून भाऊ सामंत काम पाहत आहेत.
दोन गटांत होणार स्पर्धा
ही स्पर्धा दोन गटांत घेण्यात येणार आहे. पहिला गट बालवाडी ते पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी, तर दुसरा गट महिला व पुरुषांसाठी खुला असेल.
बालगटातील पारितोषिके
- प्रथम क्रमांक : ३,००० रुपये
- द्वितीय क्रमांक : २,००० रुपये
- तृतीय क्रमांक : १,५०० रुपये
- पाच उत्तेजनार्थ पारितोषिके : प्रत्येकी ५०० रुपये
खुल्या गटातील पारितोषिके
- प्रथम क्रमांक : ५,००० रुपये
- द्वितीय क्रमांक : ३,००० रुपये
- तृतीय क्रमांक : २,००० रुपये
- दोन उत्तेजनार्थ पारितोषिके : प्रत्येकी १,००० रुपये
दोन्ही गटांतील विजेत्यांना रोख पारितोषिकांसह आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंगांचे सादरीकरण
स्पर्धकांनी भगवान श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक स्पर्धकाला किंवा सहभागी पात्रांना श्रीकृष्णाच्या जीवनातील एखादा प्रसंग एक ते दोन मिनिटांत सादर करावा लागणार आहे. यासाठी राधा-कृष्ण, कृष्ण-सुदामा, गोवर्धन पर्वत, कालियामर्दन, श्रीकृष्ण जन्म आणि कंसवध यांसारख्या प्रसंगांची निवड करता येईल. सादरीकरणात एक किंवा दोन पात्रांचा सहभाग असू शकतो.
वेशभूषा, सादरीकरणासाठी लागणारे साहित्य आणि तयारी स्पर्धकांनी स्वतः करायची आहे. स्पर्धकांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा समितीचा प्रयत्न असून, परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहणार आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी बंटी केनवडेकर (मो. ९४२२५९६६८२) किंवा अमित खोत (मो. ९४०४४५७७८८) यांच्याशी संपर्क साधावा. मालवण शहरासह संपूर्ण तालुक्यातील बालगोपाळ, महिला आणि पुरुषांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.










