टाक्यांच्या जागा बदलण्यावर आक्षेप; निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार
मालवण (प्रतिनिधी) : कोट्यवधी रुपये खर्चून मालवण शहरात राबविण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेच्या कामावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. योजनेचे निकृष्ट काम, पाण्याच्या टाक्यांच्या जागांमध्ये करण्यात आलेले बदल आणि प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार ओरसकर यांनी सत्ताधारी आणि ठेकेदाराच्या मनमानीचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून, आवश्यकतेनुसार न्यायालयातही दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
ठाकरे शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ओरसकर म्हणाले की, तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण शहराच्या पुढील ३० ते ४० वर्षांच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष कामाच्या दर्जाबाबत वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाकडून विशेष सभा किंवा आढावा बैठक घेण्यात आलेली नाही.
योजनेच्या मूळ डीपीआरनुसार रेवतळे आणि राजकोट येथे प्रस्तावित असलेल्या पाण्याच्या टाक्यांच्या जागांमध्ये बदल करून त्या कुंभारमाठ येथे हलविण्याचे ठराव सविस्तर चर्चा न करता मंजूर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पाइपलाइन खासगी जागांमधून टाकण्यात येत असल्याने भविष्यात देखभाल आणि दुरुस्ती करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
ठेकेदाराच्या सोयीसाठी तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष?
नळपाणी योजेच्या कामात ठेकेदाराच्या सोयीला प्राधान्य दिले जात असून, तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ओरसकर यांनी केला. सत्ताधारी बहुमताच्या जोरावर विरोधकांना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचे सांगत, संपूर्ण योजनेच्या कामाची गुणवत्ता, टाक्यांच्या जागांमधील बदल आणि पाइपलाइनच्या मार्गाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
अतिक्रमणे आणि अस्वच्छतेवरून म्हाडगुत यांचा प्रशासनाला जाब
दरम्यान, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांनी मालवण शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि अस्वच्छतेच्या प्रश्नावरून नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले. अतिक्रमणे हटविण्यासाठी उपोषणादरम्यान आठ दिवसांत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दोन महिने उलटूनही प्रत्यक्ष कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
रस्ते रुंदीकरणासाठी आरक्षित असलेल्या जागा अद्याप ताब्यात घेण्यात आलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली असून, इमारतींमधील सांडपाणी उघड्यावर तसेच गटारांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे म्हाडगुत यांनी निदर्शनास आणले.
मालवण शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यटनाच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. केवळ आश्वासने न देता अतिक्रमणांवर प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला नागरिकांनीही पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.











