मुंबई (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित ‘नाट्य परिषद करंडक २०२६’ या एकांकिका स्पर्धेत नाट्यांकुर, विक्रोळीच्या ‘पाकिस्तानचं यान’ या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट पारितोषिक पटकावत बाजी मारली. पुण्याच्या ‘अपूर्णम’ या एकांकिकेला उत्कृष्ट, तर अहिल्यानगरच्या ‘बिन रंगाची गोष्ट’ या एकांकिकेला उत्तम पारितोषिक मिळाले.
मराठी रंगभूमीवरील नवोदित कलाकारांना आणि नाट्यसंस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण १७ एकांकिकांनी सहभाग घेतला. विविध विषय, आशय आणि नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून सहभागी संघांनी आपली कलात्मक क्षमता सादर केली.
‘पाकिस्तानचं यान’ या एकांकिकेने प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान मिळवला. तर ‘अपूर्णम’ आणि ‘बिन रंगाची गोष्ट’ या एकांकिकांनीही आपल्या सादरीकरणातून परीक्षकांची दाद मिळवली.
या स्पर्धेमुळे नव्या पिढीतील नाट्यलेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. अशा स्पर्धांमधून मराठी रंगभूमीला नवे कलाकार आणि नवे प्रयोग मिळण्यास मदत होत असल्याची भावना नाट्यवर्तुळातून व्यक्त होत आहे.











