• ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धा, बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धा तसेच मराठी एकांकिका स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त कलाकार व तंत्रज्ञांचा होणार सन्मान
मुंबई, कोकणशक्ती डिजीटल प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांतील पारितोषिकप्राप्त कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान करण्यासाठी ‘नाट्यगौरव’ राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ २०२५-२६ आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई येथे होणार आहे.
या समारंभात ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील, २२ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील, ७ व्या दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील तसेच प्रथम महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पारितोषिकप्राप्त कलाकार व तंत्रज्ञांचा गौरव करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राला नाट्यकलेची समृद्ध परंपरा लाभली असून, राज्यातील विविध नाट्य स्पर्धांमुळे नवोदित कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होते. या स्पर्धांमधून नाट्यकलेतील वैविध्यपूर्ण प्रयोगांना प्रोत्साहन मिळते, तसेच रंगभूमीच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारांच्या कार्याला मान्यता मिळते. ‘नाट्यगौरव’ समारंभाच्या माध्यमातून या कलावंतांच्या मेहनतीचा आणि कलात्मक योगदानाचा सन्मान करण्यात येणार आहे.
‘नाट्यगौरव’ हा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नाट्यपरंपरेचे जतन व संवर्धन करण्यासोबतच नव्या पिढीतील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध नाट्यविषयक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, नाट्यप्रेमी, कलाकार, रंगकर्मी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारितोषिकप्राप्त कलावंतांच्या गौरवाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.











