मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नवी व्यवस्था; मुख्यमंत्री सहायता निधीला मिळणार सामाजिक सहभागाचे बळ
मुंबई (प्रतिनिधी) : गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या रुग्णांसह दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींनी बाधित नागरिकांना मदतीचा अतिरिक्त आधार मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना करण्यात आली आहे. कंपन्या, सामाजिक संस्था, देणगीदार आणि दानशूर व्यक्तींच्या सहभागातून अतिरिक्त निधी उभारून तो गरजूंच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीला सामाजिक सहभागातून आर्थिक बळ देणे, हा या नव्या व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे. हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंडविकार आणि मेंदूविकार यांसारख्या गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया, महागडे उपचार तसेच दीर्घकालीन वैद्यकीय उपचारांसाठी या माध्यमातून अधिक निधी उपलब्ध होऊ शकणार आहे. दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठीही विशेष मदत उभारता येणार आहे. औषधे, वैद्यकीय साहित्य आणि उपचारांसाठी आवश्यक बाबींसाठीही आर्थिक सहाय्य देता येईल.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णांच्या उपचारांसाठी सामाजिक दायित्वातून अतिरिक्त निधी उभारण्याच्या पर्यायांचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून रुग्णालये, स्वयंसेवी संस्था, कंपन्या आणि सामाजिक संस्थांना एकत्र आणून विविध वैद्यकीय मदत उपक्रम राबविण्याची व्यवस्था निर्माण होणार आहे.
या सोसायटीच्या माध्यमातून केवळ वैद्यकीय मदतीपुरते काम मर्यादित राहणार नाही. दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांना मदत, गरीब नागरिकांना आवश्यक वस्तूंचे वितरण, दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांना सहाय्य आणि सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजनही करता येणार आहे. आरोग्य जनजागृती, चर्चासत्रे आणि कार्यशाळांसारख्या सार्वजनिक आरोग्यविषयक उपक्रमांनाही निधी उपलब्ध करून देता येईल.
सामाजिक सहभागातून अधिक संसाधने उभी करून गरजू रुग्ण आणि आपत्तीग्रस्त नागरिकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा या सोसायटीचा प्रयत्न असेल. भविष्यात गरजेनुसार मदतीचे स्वरूप आणि व्याप्ती वाढविण्याचीही संधी उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमासाठी कंपन्या, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.











