‘महिमा माय माऊलीचा’ चलचित्र देखावा ठरला आकर्षण; धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण (प्रतिनिधी) : मालवण बाजारपेठेतील हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सवाची गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. ढोल-ताशांचा गजर, आकर्षक रोषणाई आणि सजविलेल्या पालखीतून काढण्यात आलेली श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक भाविकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. यावेळी सादर करण्यात आलेला ‘महिमा माय माऊलीचा’ हा चलचित्र देखावा विशेष आकर्षण ठरला.
हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुश्राव्य भजने, जंगी डबलबारी सामना, पारंपरिक दशावतारी नाट्यप्रयोग, वारकरी भजन, सत्यनारायण महापूजा, चित्रपट प्रदर्शन, अथर्वशीर्ष पठण आणि महाप्रसाद अशा कार्यक्रमांनी उत्सवात रंगत आणली.
शुक्रवारी भक्तिमय वातावरणात श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई आणि देखण्या सजावटीने सजविलेली पालखी हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. या मिरवणुकीत मंडळाचे सदस्य, बाजारपेठेतील व्यापारी बांधव आणि गणेशभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मिरवणुकीत सादर झालेल्या ‘महिमा माय माऊलीचा’ या चलचित्र देखाव्यात कुडाळ तालुक्यातील पावशी येथील सातेरी देवीचा इतिहास आणि महिमा प्रभावीपणे उलगडण्यात आला. चलचित्राच्या माध्यमातून देवीच्या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेची माहिती भाविकांसमोर मांडण्यात आली. श्रद्धा आणि ऐतिहासिक परंपरेचा संगम असलेल्या या देखाव्याला उपस्थितांकडून विशेष प्रतिसाद मिळाला. या देखाव्यात चेतन हडकर, दीपिका शेलटकर आणि मीनू देऊलकर यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्या सादरीकरणामुळे हा देखावा विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरला.












