‘गजेंद्रमोक्ष’ चलचित्र देखावा ठरला आकर्षण; कलाकारांचा अभिनय, ट्रिकसीन्स आणि नृत्याविष्काराला दाद
मालवण (प्रतिनिधी) : मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीने उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. या मिरवणुकीत श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सादर करण्यात आलेला पौराणिक कथेवर आधारित ‘गजेंद्रमोक्ष’ हा चलचित्र देखावा विशेष आकर्षण ठरला. कलाकारांचा अभिनय, कल्पक ट्रिकसीन्स, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आणि नृत्याविष्कार यांची सुरेख सांगड या देखाव्यात पाहायला मिळाली.
भरड येथील श्री दत्त मंदिरात दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला श्री गणेशमूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली होती. उत्सवानिमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध मंडळांची भजने, सुगम संगीत, कीर्तने, दशावतारी नाट्यप्रयोग आणि सत्यनारायण महापूजा अशा कार्यक्रमांना भाविकांचा प्रतिसाद मिळाला. ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’ हा अभिवाचन कार्यक्रम, कीर्तन पंचक आणि अष्टपैलू कलानिकेतनचा सुगम संगीत कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरले.
शनिवारी सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सादर झालेल्या ‘गजेंद्रमोक्ष’ या चलचित्र देखाव्याने उपस्थितांची वाहवा मिळवली. पौराणिक कथानकाची मांडणी, कलाकारांचा अभिनय, नेत्रदीपक ट्रिकसीन्स, आधुनिक तंत्रज्ञान आणि नृत्याविष्कार यांमुळे देखाव्याला विशेष रंगत आली.
या देखाव्याची संकल्पना श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची होती. संहिता लेखन आणि निवेदन महेश धामापूरकर यांनी केले. निर्मितीमध्ये सुमुख आर्ट्सचे नंदू फणसेकर, विवेक देऊलकर, पार्थ मेस्त्री, प्रमोद मेस्त्री, सर्वेश परुळेकर, संजू परुळेकर आणि तुषार मेस्त्री यांचा सहभाग होता.
प्रकाशयोजना सचिन आरोलकर, सुयोग ढोलम आणि बबन मयेकर यांनी सांभाळली. तंत्रसहाय्य पराग परब, समीर वायंगणकर, अण्णा माणगावकर, जान्हवी परुळेकर आणि जितेश वेर्लेकर यांनी केले. ध्वनी व्यवस्था श्री दत्तराज साउंडचे बाळा आचरेकर आणि अभय कदम यांनी, तर फायरवर्कची जबाबदारी सिद्धार्थ परब आणि कौस्तुभ गावकर यांनी सांभाळली.
देखाव्यात श्री विष्णूची भूमिका प्रवीण पराडकर, गजेंद्र/इंद्रधुम्नची भूमिका संतोष मंडलिक, तर मगर/गंधर्वची भूमिका प्रथमेश सामंत यांनी साकारली. नृत्य कलाकार म्हणून चेतन हडकर, सागर रेडकर, सिद्धेश पालव, प्रथमेश चव्हाण, यशश्री वरक, स्वरूपा मयेकर, पंकजा मालवणकर आणि काव्या सरकारे यांनी योगदान दिले. सर्वांच्या सांघिक प्रयत्नांतून साकारलेल्या या देखाव्याने गणेश विसर्जन मिरवणुकीची रंगत वाढवली.












