मालवण (प्रतिनिधी) : मराठी रंगभूमीच्या १८३ वर्षांच्या समृद्ध आणि गौरवशाली परंपरेला अभिवादन करत मालवणमध्ये मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नाट्यकर्मी, कलाकार आणि नाट्यप्रेमी नागरिकांनी मामा वरेरकर नाट्यगृह येथे एकत्र येत रंगदेवतेचे पूजन करून रंगभूमीला वंदन केले.
यावेळी मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळाचे विधिवत पूजन करण्यात आले. या माध्यमातून मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मालवणच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या स्व. मामा वरेरकर नाट्यगृहाच्या रंगमंचावर आजवर अनेक दिग्गज कलाकारांसह स्थानिक कलाकारांनीही आपल्या अभिनयकौशल्याची छाप उमटवली आहे. या रंगमंचावर कला सादर करत अनेक स्थानिक कलाकारांनी नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळे मामा वरेरकर नाट्यगृह हे केवळ नाट्यप्रयोगांचे व्यासपीठ न राहता मालवणच्या सांस्कृतिक जडणघडणीचे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे.
रंगभूमीची ही परंपरा अशीच पुढे सुरू राहावी, नव्या पिढीतील कलाकारांना या रंगमंचावर संधी मिळावी आणि मामा वरेरकर नाट्यगृह कालानुरूप अधिकाधिक सुसज्ज व्हावे, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी उपस्थित नाट्यकलाकारांना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याधिकारी प्रतीक थोरात, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सिद्धार्थ जाधव, ललित चव्हाण, महेश कोयंडे, शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख राजू बिडये, राज्य नाट्य स्पर्धा मालवण केंद्राचे समन्वयक संजय शिंदे, सुभाष कुमठेकर, भाई मांजरेकर, शाम वाक्कर, वैभव मांजरेकर यांच्यासह नाट्यप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते.











