दोघांविरोधात गुन्हा दाखल; मालवण पोलिसांची अवैध दारूविक्रीविरोधातील मोहीम तीव्र
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यात अवैध दारू विक्री आणि साठवणुकीविरोधात मालवण पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. दांडी आणि देवबाग येथील दारू अड्ड्यांवर छापेमारी केल्यानंतर आता पोलिसांनी सुकळवाड येथे मोठी कारवाई केली आहे. बुधवारी रात्री टाकलेल्या छाप्यात तब्बल ३ लाख ८४ हजार ३०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी प्रमोद मुसळे आणि चेतन प्रमोद मुसळे (दोघेही रा. सुकळवाड, ता. मालवण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवण तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. विविध ठिकाणी छापेमारी करून अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच मोहिमेअंतर्गत सुकळवाड येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीच्या दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा संपूर्ण साठा जप्त केला असून, त्याची बाजारभावानुसार किंमत ३,८४,३०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा छापा टाकला. या पथकात पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोसले, हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, हेड कॉन्स्टेबल सुप्रिया पवार आणि हेड कॉन्स्टेबल सोनाली पाटकर यांचा समावेश होता.
दरम्यान, मालवण तालुक्यात अवैध दारू विक्री आणि साठवणुकीविरोधात पोलिसांनी सलग कारवाया सुरू केल्याने संबंधित व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक आणि साठवणूक रोखण्यासाठी पोलिसांनी आपली गस्त आणि तपासणी अधिक तीव्र केली आहे. आगामी काळातही अशा अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.










