सिंधुदुर्गातील नामवंत दशावतार मंडळांचे आज विविध गावांत प्रयोग
सिंधुदुर्ग : कोकणच्या समृद्ध लोककला परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दशावतार नाट्यकलेचा आज, सोमवार ९ नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी जागर रंगणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई आणि परिसरातील १६ ठिकाणी विविध दशावतार मंडळांचे नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे दशावतारप्रेमी रसिकांना पौराणिक कथांवर आधारित नाट्यप्रयोगांची मेजवानी अनुभवता येणार आहे.
आजच्या प्रयोगांमध्ये सुधीर कलिंगण यांच्या कलेश्वर दशावतार मंडळाचा कांजूरमार्ग येथे, देवेंद्र नाईक यांच्या चेंदवणकर दशावतार मंडळाचा चेंदवण येथे, तर शरद मोचेमाडकर यांच्या जय हनुमान दशावतार मंडळाचा आसोली येथे प्रयोग होणार आहे.
तळवणे येथे दत्तमाऊली दशावतार मंडळ सिंधुदुर्ग, पालये येथे नितीन आसयेकर यांचे भूमिका दशावतार मंडळ, जोगेश्वरी येथे आबा कलिंगण यांचे कलेश्वर दशावतार मंडळ, तर आरोस येथे नाना प्रभू यांच्या वावळेश्वर दशावतार मंडळाचा प्रयोग रंगणार आहे.
याशिवाय दाभोली येथे ओंकार दशावतार मंडळ म्हापण, धारगळ येथे सावरेश्वर दशावतार मंडळ आवेरे, कांदळगाव येथे सिद्धेश्वर दशावतार मंडळ दोडामार्ग, वेंगुर्ले रामघाट येथे मोरेश्वर दशावतार मंडळ मोरे, तर चिपी येथे विठ्ठलादेवी दशावतार मंडळ राठीवडे यांचे प्रयोग होणार आहेत.
मणेरी येथे सिद्धिविनायक दशावतार मंडळ पिकुळे, पेंडूर येथे अष्टविनायक दशावतार मंडळ निरवडे, खानापूर येथे श्री देवी शेंडोबा माऊली दशावतार मंडळ देवसू, तर कळवा येथे ओम वीरभद्र दशावतार मंडळ भांडुप यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
पौराणिक कथानक, उत्स्फूर्त संवाद, रंगभूषा, वेशभूषा आणि पारंपरिक संगीताच्या साथीने सादर होणारी दशावतार कला आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गावोगावी होणाऱ्या या प्रयोगांमुळे कोकणच्या लोककलेचा वारसा जपला जात असून, दशावतारप्रेमींसाठी आजची रात्र सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.











