मुंबई : दिवाळीचा उत्सव संपला; मात्र फटाक्यांचा धूर अजूनही हवेत तरंगतोय आणि त्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना आपल्या श्वासातून मोजावी लागत आहे. एकीकडे फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेतील प्रदूषण वाढत असताना, दुसरीकडे प्रदूषणाविरोधात जनजागृती करणाऱ्या दिया मिर्झा यांच्या व्हिडिओवरून राजकीय वाद निर्माण झाला. मुंबई महापालिकेने हा व्हिडिओ हटवल्यानंतर पर्यावरणाच्या प्रश्नालाच राजकीय रंग दिला जात असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. फटाक्यांच्या धुरापेक्षा प्रदूषणाविरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न अधिक धोकादायक आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दिवाळीनंतर सोमवारी, ९ नोव्हेंबर रोजी मुंबई आणि पुण्यातील हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. पुण्यातील शहरस्तरीय हवा गुणवत्ता निर्देशांक अर्थात AQI तब्बल ४३२ नोंदवला गेला. हा स्तर ‘गंभीर’ श्रेणीत मोडतो. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या शास्त्रज्ञांनी फटाक्यांमधून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म कणांमुळे प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. काही निरीक्षण केंद्रांवर PM2.5 चे प्रमाण प्रति घनमीटर १,००० मायक्रोग्रॅमच्या जवळ पोहोचल्याचे वृत्त आहे.
मुंबईचा शहरस्तरीय AQI सोमवारी सकाळी ९ वाजता १७१ नोंदवण्यात आला. हा स्तर ‘मध्यम’ श्रेणीत असला, तरी शहरातील आठ निरीक्षण केंद्रांवर AQI २०० च्या पुढे गेला. वांद्रे पूर्व येथील खेरवाडीमध्ये २६५, वांद्रे-कुर्ला संकुलात २३२, शिवडीमध्ये २२९, देवनारमध्ये २२८, घाटकोपरमध्ये २२१, नेव्ही नगर आणि शिवाजीनगरमध्ये प्रत्येकी २२०, तर चेंबूरमध्ये २१५ अशी नोंद झाली. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी AQI ४०० च्याही पुढे गेल्याचे नोंदवण्यात आले.
आजची उपलब्ध AQI स्थिती :
- मुंबई : १७१ – मध्यम; काही भागांत २०० पेक्षा अधिक.
- पुणे : ४३२ – गंभीर.
- नवी मुंबई : IITM/MPCB च्या ९ नोव्हेंबर सकाळी १० वाजताच्या स्थानक नोंदींनुसार CBD बेलापूर २३२, नेरूळ २१४, सानपाडा १९०, वाशी २०० आणि कळंबोली ८८.
या पार्श्वभूमीवर दिया मिर्झा यांच्या व्हिडिओवरून झालेला वाद पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबई महापालिकेने प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश देण्यासाठी दिया मिर्झा यांच्यासह काही सेलिब्रिटींचे व्हिडिओ तयार केले होते. मात्र, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी दिया मिर्झा यांच्या सहभागावर आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडिया खात्यांवरून हटवला. इतर सेलिब्रिटींचे व्हिडिओ मात्र उपलब्ध राहिल्याने या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले.
दिया मिर्झा यांनीही हा संदेश सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाच्या हितासाठी असल्याचे स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांमुळे व्हिडिओ हटवण्यात आल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आणि तो पुन्हा प्रसारित करण्याचे निर्देश दिले. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्याला राजकीय रंग देऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. फटाके फोडण्याच्या समर्थनार्थ राजकीय वक्तव्ये केली जात असताना प्रदूषणाचे दुष्परिणाम मात्र सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दमा आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. प्रदूषणाविरोधातील जनजागृतीला विरोध करण्याऐवजी फटाक्यांचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र त्या आनंदाची किंमत दुसऱ्याच्या आरोग्याने का मोजावी? सणाच्या नावाखाली वाढणारा धूर, ध्वनीप्रदूषण आणि त्यावर होणारे राजकीय समर्थन यामुळे सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा दुय्यम ठरू नये. प्रदूषणाला धार्मिक किंवा राजकीय चष्म्यातून पाहण्याऐवजी नागरिकांच्या जगण्याच्या हक्कातून पाहण्याची गरज आहे. कारण हवा कोणत्याही पक्षाची, धर्माची किंवा विचारधारेची नसते; ती प्रत्येकाची असते.











