दोन दिवसांत आगीच्या ७४ घटना; वित्तहानी आणि नागरिकांना दुखापत झाल्याने महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांचे आदेश
नवी मुंबई : फटाक्यांमुळे होणाऱ्या आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यावर निर्बंध घातले आहेत. हवेत उडणारे रॉकेट, तत्सम फटाके आणि अत्यंत ज्वलनशील फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, ९ नोव्हेंबरपासून लागू झालेले हे आदेश ८ जानेवारी २०२७ पर्यंत लागू राहणार आहेत.
गेल्या दोन दिवसांत नवी मुंबई परिसरात फटाक्यांमुळे आगीच्या तब्बल ७४ घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, काही ठिकाणी नागरिकही जखमी झाले आहेत. विशेषतः हवेत उडणारे रॉकेट आणि अत्यंत ज्वलनशील फटाक्यांमुळे आग लागण्याचा धोका वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडून विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके विविध भागांत लक्ष ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.
दरम्यान, नागरिकांनी फटाके फोडताना सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि प्रतिबंधित फटाक्यांचा वापर करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि मालमत्तेचे संरक्षण यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.









