दिवाळी पाडव्याला १० नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक पालखी सोहळा; हजारो भाविकांना ग्रामदैवतांच्या दर्शनाची पर्वणी
मालवण (प्रतिनिधी) : श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा त्रिवेणी संगम… ढोलताशांचा गजर, जयघोष आणि ग्रामदैवतांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालेले हजारो भाविक… अशा भक्तिमय वातावरणात उद्या, मंगळवार १० नोव्हेंबर रोजी मालवणनगरी ग्रामदैवतांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळा दिवाळी पाडव्याच्या मंगलदिनी दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. या सोहळ्यानिमित्त अवघी मालवणनगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
मालवणच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेत या पालखी सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभर ज्या क्षणाची मालवणकर आतुरतेने वाट पाहतात, त्या ग्रामदैवतांच्या नगरप्रदक्षिणेचा हा दिवस असतो. मंदिरातून बाहेर पडून ग्रामदैवते थेट भक्तांच्या भेटीला येतात, ही श्रद्धा या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. शहरासह परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या हजारो भाविकांसाठी आपल्या आराध्य दैवतांच्या दर्शनाची ही मोठी पर्वणी ठरते.
या पालखी सोहळ्याला दुपारी १ वाजता देऊळवाडा येथील श्री देव रामेश्वर मंदिरातून प्रारंभ होईल. त्यानंतर श्री देव नारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई आणि श्री देवी सातेरी यांना सांगणे करून पालखी आडवण मार्गे तानाजी नाका, वायरी येथे पोहोचेल. तेथून श्री देव भूतनाथ मंदिरात दर्शन घेऊन समुद्रकिनाऱ्याच्या मार्गाने मोरयाचा धोंडा येथे जाईल. पुढे दांडेश्वर मंदिर, श्री काळबादेवी मंदिर, जोशी मांड असा प्रवास करत पालखी मालवण नगर वाचनालयामार्गे सोमवार पेठेतील श्री देव रामेश्वर मांड येथे भाविकांना दर्शन देईल. त्यानंतर भरड बाजारपेठेमार्गे पुन्हा देऊळवाडा येथील मंदिरात पालखी दाखल होईल. यानंतर सोहळ्याची सांगता होणार आहे.
ग्रामदैवतांच्या स्वागतासाठी पालखी मार्गावरील विविध भागांत जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पताका, विद्युत रोषणाई, आकर्षक रांगोळ्या आणि सजावटीने परिसर सजवण्यात येत आहे. काही ठिकाणी भाविकांसाठी अल्पोपहार आणि शीतपेयांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. घराघरांतून ग्रामदैवतांच्या स्वागताची तयारी सुरू असून, पालखीच्या आगमनाने प्रत्येक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने मालवणच्या बाजारपेठेतही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ग्रामदैवतांच्या दर्शनासोबतच दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक आणि भाविकांची बाजारपेठेत रेलचेल पाहायला मिळणार आहे. व्यापारी बांधवांनीही भाविकांच्या स्वागतासाठी तयारी केली आहे.
ग्रामदैवतांची पालखी म्हणजे केवळ नगरप्रदक्षिणा नव्हे, तर मालवणकरांच्या पिढ्यान्पिढ्या जपलेल्या श्रद्धेचा आणि समृद्ध देवपरंपरेचा जिवंत आविष्कार आहे. पालखीच्या दर्शनासाठी नतमस्तक होणारे भाविक, आसमंतात घुमणारा जयघोष आणि भक्तीने भारावलेले वातावरण यामुळे दिवाळी पाडव्याचा आनंद अधिकच द्विगुणित होणार आहे.
या ऐतिहासिक आणि मंगलमय पालखी सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, सातेरी व इतर देवस्थान ट्रस्ट, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.











