मालवण : कोकणातील नाट्यपरंपरेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि नव्या नाट्यप्रयोगांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी यंदा मालवणमध्ये रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेत १९ ते २९ नोव्हेंबरदरम्यान विविध नाट्यसंस्थांची १२ नाटके सादर होणार आहेत. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात या नाट्यप्रयोगांचा आनंद नाट्यरसिकांना घेता येणार आहे.
स्पर्धेचा प्रारंभ १९ नोव्हेंबरला कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्र्स्ट मालवण यांचे दीपेश सावंत लिखित आणि रोहित परुळेकर दिग्दर्शित ‘विकेटकीपर‘, तर २० नोव्हेंबरला तेजस मस्के लिखित दिग्दर्शित साईकला कला क्रिडा मंच यांचे ‘बिलिमारो’ हे नाटक सादर होईल.
२१ नोव्हेंबरला नागरिक बहुद्देशीय सेवा प्रतिष्ठान यांचे देवेंद्र गावडे लिखित व दिग्दर्शित ‘सरभरीत सांबारा‘, २२ नोव्हेंबरला बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ यांचे प्रा. मधुकर तोरडमलकर लिखित आणि केदार सामंत दिग्दर्शित ‘कलम ३०२’, तर २३ नोव्हेंबरला ग्रामोन्नती मंडळ आचरा यांचे किशोर तळवडकर लिखित व नंदकुमार तळवडकर दिग्दर्शित ‘माझो गाव तसो चांगलो’ या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.
२५ नोव्हेंबरला श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थान यांचे किशोर तळवडकर लिखित व दिग्दर्शित ‘रापण’, तर २६ नोव्हेंबरला आर्ट सर्कल देवगड यांचे चंद्रशेखर मुळये लिखित आणि मंदार केळकर दिग्दर्शित ‘अल्बम’ हे नाटक रंगणार आहे.
२८ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता श्री साई गणेश मित्रमंडळ कलमठ, कणकवली यांचे विठ्ठल सावंत लिखित आणि शेखर गवस दिग्दर्शित ‘आमचा ता तुमचा’, त्याच दिवशी २८ नोव्हेंबरला अभियान आम्ही मालवणी निर्मित रात्रौ आठ वाजता चारुहास पांजरी लिखित आणि विवेक जाधव दिग्दर्शित ‘मु. पो. येडे बुद्रुक’ या नाटकांचे सादरीकरण होईल. रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मालवण यांचे कोमल वांजरे आणि गौरव बहुले लिखित, रूपेश नेवगी दिग्दर्शित ‘चित्रकथी’,
२९ नोव्हेंबरचा प्रयोग दुपारी ३ वाजता आणि सात वाजता, तर अन्य सर्व नाट्यप्रयोग सायंकाळी ७ वाजता सुरू होतील. स्पर्धेची प्रवेशिका १५ आणि ३० रुपये अशी ठेवण्यात आली आहे.
राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने मालवणच्या नाट्यरसिकांना विविध विषय, आशय आणि अभिव्यक्ती असलेल्या नाटकांचा अनुभव घेता येणार आहे. स्थानिक नाट्यसंस्था, कलाकार आणि रंगकर्मींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनेही ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.













