मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहर आणि परिसरात सायकलवरून फिरत चुरमुरे, चणे, शेंगदाणे आणि खारीमुरी विकणारे परिचित विक्रेते शांताराम हनुमंत बिले (वय ७२, रा. कोळंब, खडवणनाका) यांचे गुरुवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास निधन झाले.
शांताराम बिले यांनी अनेक वर्षे मालवण शहरासह आजूबाजूच्या परिसरात सायकलवरून फिरत चुरमुरे विक्रीचा व्यवसाय केला. चुरमुरे विकण्याची त्यांची खास शैली, मिश्किल बोलणे आणि आपुलकीचा स्वभाव यामुळे ते आबालवृद्धांमध्ये परिचित होते. त्यांच्या सायकलची चाहूल लागताच चुरमुरे खाण्यासाठी धाव घेणाऱ्या अनेकांच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत.
काळ बदलला, बाजारपेठा बदलल्या; मात्र सायकलवरून फिरत चुरमुरे विकणाऱ्या बिले काकांची ओळख मालवणकरांच्या मनात कायम राहिली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सून आणि नातू असा परिवार आहे. पंढरीनाथ आणि आदिनाथ यांचे ते वडील होत.











