नवोदितांसह प्रस्थापित कवी-कवयित्रींना स्वरचित कविता सादर करण्याची संधी
मालवण (प्रतिनिधी) : स्थानिक साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी खुले स्थानिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन २०२६ च्या निमित्ताने होणाऱ्या या उपक्रमात मालवण व परिसरातील नवोदितांसह प्रस्थापित कवी-कवयित्रींना आपल्या स्वरचित कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानित या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, चिवला बीच, मालवण येथे हे कवी संमेलन पार पडणार आहे.
स्थानिक साहित्यिकांना अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, काव्यलेखनाची आवड जोपासणे आणि नव्या साहित्यिकांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. मालवणच्या साहित्यविश्वातील विविध काव्यप्रवाह आणि नव्या लेखनप्रयोगांचा आस्वाद या माध्यमातून रसिकांना घेता येणार आहे.
संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवी-कवयित्रींनी आपली स्वरचित कविता आणि संक्षिप्त साहित्यिक परिचय ऋतुजा केळकर यांच्या व्हॉट्सॲप क्रमांक ९४२०४२३७९० वर पाठवून नावनोंदणी करावी.
मालवण व परिसरातील सर्व नवोदित आणि प्रस्थापित कवी-कवयित्रींनी या खुले कवी संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष डॉ. देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.











