WCSS चा पुढाकार; शेतकऱ्यांची जलसुरक्षा आणि वन्यजीव संवर्धनाचा दुहेरी उद्देश
मालवण (प्रतिनिधी) : पावसाळ्यात ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर साठा करणे आणि भूजल पातळीत वाढ घडवून आणणे, या उद्देशाने डिकवल-आनंदनगर येथील ओढ्यावर वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे. वाइल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटी ऑफ सिंधुदुर्ग (WCSS) यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. परिणामी, उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या पाणीविषयक गरजा पूर्ण करण्याबरोबरच परिसरातील जलस्रोतांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा लाभ केवळ शेतीपुरता मर्यादित नसून स्थानिक जैवविविधतेलाही त्याचा फायदा होणार आहे. ओढ्यात पाणीसाठा उपलब्ध राहिल्याने पक्षी, उभयचर, सरपटणारे प्राणी आणि अन्य वन्यजीवांसाठी पाण्याचा नैसर्गिक स्रोत निर्माण होण्यास मदत होईल. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी भटकंती कमी करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम उपयुक्त ठरू शकतो.
स्थानिक साधनसामग्री आणि लोकसहभागातून उभारता येणारे वनराई बंधारे हे ग्रामीण भागातील जलसंधारणाचे प्रभावी माध्यम आहे. शेतकऱ्यांची जलसुरक्षा, भूजल पुनर्भरण आणि वन्यजीव संवर्धन यांचा समन्वय साधणारा WCSSचा हा उपक्रम शाश्वत जलव्यवस्थापन आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्वाच्या दिशेने सकारात्मक पाऊल मानले जात आहे.












