मालवण (प्रतिनिधी) : सणांचा आनंद एकमेकांसोबत वाटण्यातच खरा आनंद असतो, याचा प्रत्यय ज्ञानदीप विद्यालय, वायंगणी येथे आला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष हनुमंत गणेश प्रभू यांनी स्वखर्चातून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करत त्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रभू यांनी सणांचा आनंद घेत असतानाच अभ्यासाकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले. मोबाईलचा अतिवापर टाळावा, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेऊन पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मिठाई मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. संस्थाध्यक्षांनी स्वतःहून घेतलेल्या या उपक्रमाचे शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाबू हडकर, मुख्याध्यापक टकले, जाधव सर आणि सौ. प्रभा हळदणकर यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाला शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाबू हडकर, मुख्याध्यापक टकले सर, जाधव सर, सौ. प्रभा हळदणकर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले, तर सौ. प्रभा हळदणकर यांनी आभार मानले.












