मालवण (प्रतिनिधी) : मसुरे गावची मूळमाया असलेल्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जल मंदिरात २० नोव्हेंबर रोजी आठ प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता या धार्मिक सोहळ्याला सुरुवात होणार असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
या सप्ताहात विविध भजनी मेळ्यांचा सहभाग असणार आहे. भाविकांनी आपल्या भजनी मेळ्यांसह उपस्थित राहून अखंड हरिनाम सप्ताहात सहभागी व्हावे, तसेच श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने श्री देवी सातेरीचा कार्तिकी जत्रोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त देवीची विधिवत पूजा-अर्चा, रात्री पुराणवाचन, पालखी प्रदक्षिणा आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.
जत्रोत्सवाची सांगता रात्री १२ वाजता चेंदवणकर-गोरे दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांच्या दशावतारी नाट्यप्रयोगाने होणार आहे. या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला भाविकांनी व नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










