‘किशोर’ आणि ‘साधना’ दिवाळी अंकांचे मोफत वाटप; सहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षभर मिळणार ‘किशोर’ मासिक
मालवण (प्रतिनिधी) : दिवाळी म्हटली की भेटवस्तूंची देवाणघेवाण आलीच; मात्र टोपीवाला हायस्कूलने विद्यार्थ्यांना यंदा पुस्तकांच्या रूपाने ज्ञानाची अनोखी भेट दिली आहे. शाळेच्या मराठी विभागाच्या वतीने आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना ‘किशोर’ आणि ‘साधना’ या दिवाळी अंकांचे मोफत वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, बालभारतीतर्फे प्रकाशित होणारे ‘किशोर’ मासिक विद्यार्थ्यांना पुढील संपूर्ण वर्षभर दर महिन्याला मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता सहावीसाठी वाचनालयाचा स्वतंत्र तास ठेवण्यात आला आहे. या संधीचा प्रभावी उपयोग करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, मराठी भाषेविषयी प्रेम वाढवणे तसेच त्यांची कल्पनाशक्ती, आकलनशक्ती आणि विचारक्षमता विकसित करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
अनेक पिढ्यांच्या बालवाचकांना वाचनाची गोडी लावणाऱ्या ‘किशोर’ मासिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर महिन्याला नवे साहित्य, नवे विषय आणि ज्ञानाचे वेगवेगळे पैलू अनुभवता येणार आहेत. दिवाळीच्या निमित्ताने मिळालेली ही पुस्तकभेट विद्यार्थ्यांसाठी केवळ क्षणिक आनंद देणारी नसून, त्यांना वर्षभर वाचनाच्या विश्वाशी जोडणारी ठरणार आहे.
भेटवस्तूंचा आनंद काही काळ टिकतो; मात्र पुस्तकांशी जडलेली मैत्री आयुष्यभर सोबत करते, हा विचार या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्याबरोबरच मराठी साहित्याची ओळख आणि पुस्तकांशी मैत्री निर्माण करण्याच्या दृष्टीने टोपीवाला हायस्कूलचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. वळंजू, पर्यवेक्षक श्री. वेरलकर, डॉ. ज्योती तोरसकर, अक्षता तांबे, महेश धामापूरकर, कोकरे मॅडम आणि सुधीर गोसावी यांनी विशेष प्रयत्न केले. शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.












