सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीसाठी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोकण आणि नाशिक विभागातील या पदभरतीसाठी आता १७ जानेवारी २०२७ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, जिल्हा प्रशासनाने परीक्षार्थींना याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरती प्रक्रियेसाठी देण्यात आलेली वयोमर्यादेची शिथिलता महसूल सेवक पदासाठी लागू करण्याबाबत शासन स्तरावर अभिप्राय घेण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच, राज्यातील अन्य महसुली विभागांतील निवडणूक आचारसंहितेमुळे स्थगित झालेल्या आणि कोकण विभागातील पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा एकत्रित घेण्याच्या दृष्टीने सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान तालुकानिहाय रिक्त पदांची यादी तयार केली जाणार आहे. १ ते १५ डिसेंबर या कालावधीत रिक्त जागांनुसार बिंदुनामावली तयार करण्यात येईल. १५ डिसेंबरला परीक्षा भरती समिती स्थापन केल्यानंतर १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
१ ते ७ जानेवारी २०२७ या कालावधीत प्राप्त अर्जांची छाननी होईल. पात्र उमेदवारांना ८ ते १५ जानेवारीदरम्यान प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर १७ जानेवारीला लेखी परीक्षा होणार असून, १८ जानेवारीला उत्तरसूची आणि निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे. १८ ते २५ जानेवारीदरम्यान कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असून, २६ जानेवारी २०२७ रोजी अंतिम नियुक्तीपत्रे निर्गमित करण्यात येणार आहेत.
त्यामुळे १५ नोव्हेंबर रोजी परीक्षा होणार नसल्याची परीक्षार्थींनी नोंद घ्यावी. तसेच, नव्या वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी आणि पुढील प्रक्रिया करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.











