कुडाळ प्रतिनिधी – समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे आणि ब्रिटिश सत्तेविरोधात क्रांतीची मशाल पेटवणारे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे… १४ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या कालावधीत स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिरे, आधार कार्ड आणि शासकीय दाखले सेवा शिबिरांसह विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जाणार आहेत…
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सेवा सप्ताहाची सुरुवात १४ नोव्हेंबरला होणार आहे… मालवण तालुक्यातील वडाचा पाट आणि कणकवलीतील गणपती साना येथे स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे… तर १५ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल… याच दिवशी सायंकाळी कणकवलीतील गणपती साना येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे…
सेवा सप्ताहात शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे… १६ नोव्हेंबरला देवगडमधील मोंड निकमवाडी, मालवणमधील कुंभारमाठ आणि वेंगुर्ला कॅम्प येथे आधार कार्ड आणि विविध शासकीय दाखल्यांसाठी सेवा शिबिरे भरवण्यात येणार आहेत… याच ठिकाणी महिला सुरक्षा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध, बालविवाह आणि बालमजुरी प्रतिबंधक कायद्यांबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे…
:
१७ नोव्हेंबरला वेंगुर्ला कॅम्प, कुडाळ तालुक्यातील तुपटवाडी आणि देवगड तालुक्यातील मुणगे येथे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे… तर १८ नोव्हेंबरला शासकीय योजनांची माहिती आणि मार्गदर्शन केल्यानंतर मृद व जलसंधारण विभागामार्फत जलजागृती अभियान राबवण्यात येणार आहे…
सेवा सप्ताहातील प्रमुख उपक्रम
- १४ नोव्हेंबर – स्वच्छता मोहीम
- १५ नोव्हेंबर – प्रतिमा पूजन आणि दीपोत्सव
- १६ नोव्हेंबर – आधार कार्ड, दाखले आणि कायदेविषयक मार्गदर्शन
- १७ नोव्हेंबर – आरोग्य शिबिरे
- १८ नोव्हेंबर – शासकीय योजनांचे मार्गदर्शन आणि जलजागृती अभियान
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या उपक्रमांच्या आयोजनाबाबत आदेश जारी केले आहेत… एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विशाल घोरपडे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे… सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने कार्यक्रम राबवावेत आणि १९ नोव्हेंबरपर्यंत छायाचित्रांसह अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत…
भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्षाचा आणि सामाजिक समतेच्या विचारांचा जागर करत, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा या सेवा सप्ताहाचा उद्देश आहे… सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या या उपक्रमांना नागरिकांचा किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…











