जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगणार सामने; विविध वयोगटांतील खेळाडूंचा सहभाग
मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी इंडियन ऑइल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा मालवण येथे उत्साहात सुरू झाली. महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन, जिल्हा सिंधुदुर्ग आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन मालवण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त दिगंबर सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेबल टेनिस खेळाडूंना स्पर्धेची संधी मिळावी, तसेच या खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने इंडियन ऑइलच्या सहकार्याने दरवर्षी मालवणमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाते. २०१८ पासून इंडियन ऑइल कंपनी या स्पर्धेला प्रायोजकत्व देत आहे.
यंदाच्या स्पर्धेत ११ व १३ वर्षांखालील मुले-मुली, १५ व १७ वर्षांखालील मुले-मुली, पुरुष एकेरी, महिला एकेरी तसेच पुरुष-महिला मिश्र दुहेरी अशा विविध गटांत सामने रंगणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
उद्घाटन समारंभाला मालवण एज्युकेशन सोसायटीचे सचिव विजय कामत, विश्वस्त दिगंबर सामंत, मालवणी कवी रुजारिओ पिंटो, महासिंधू टेबल टेनिस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विष्णू कोरगावकर, सचिव हेमंत वालकर, कोषाध्यक्ष नितीन तळेकर, दिलीप हुनारी, विलास परुळेकर, क्षितिज हुनारी, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे निशाकांत पराडकर यांच्यासह स्पर्धक, पालक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी केले, तर विष्णू कोरगावकर यांनी आभार मानले.












