वनराई आणि एचडीएफसी बँकेचा आचरे येथे पुढाकार; कलिंगड पिकाचा प्रात्यक्षिक प्लॉट विकसित
मालवण (प्रतिनिधी) : पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पीक उत्पादन आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी वनराई संस्था आणि एचडीएफसी बँक परिवर्तन यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे वनराईचे काम महत्त्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गार आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी व्यक्त केले.
वनराई संस्था आणि एचडीएफसी बँक परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत आचरा येथील वरचीवाडीमध्ये कलिंगड पिकाचा प्रात्यक्षिक प्लॉट विकसित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शेतकरी धर्माजी कदम यांच्या शेतात हा प्रकल्प राबविण्यात येत असून, धर्माजी भगवान कदम, सचिन धर्माजी कदम, हरिश्चंद्र भगवान कदम आणि शिवम सचिन कदम हे शेतकरी यामध्ये सहभागी झाले आहेत.
या प्रात्यक्षिक प्लॉटची आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि या उपक्रमाच्या उद्देशाविषयी माहिती जाणून घेतली.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, वनराई संस्थेचे फील्ड कोऑर्डिनेटर शिवराम म्हापणकर, गौरी मायनाक आणि व्हिलेज रिसोर्स पर्सन (VRP) प्रथमेश आचरेकर उपस्थित होते. त्यांनी प्रात्यक्षिक प्लॉटची उभारणी, कलिंगड पिकाचे व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात माहिती दिली.
या प्रात्यक्षिक प्लॉटच्या माध्यमातून परिसरातील अन्य शेतकऱ्यांनाही सुधारित शेती पद्धतींची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, योग्य पीक व्यवस्थापन आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी वनराईचे फील्ड कोऑर्डिनेटर शिवराम म्हापणकर यांनी व्यक्त केला.












