घरासह सहा वाहने जळून खाक; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आर्थिक मदत
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बिळवस-भोगलेवाडी सडा येथील सुनील भोगले यांच्या घराला गुरुवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत घरासह अंगणात उभी असलेली सहा वाहने जळून खाक झाली. या दुर्घटनेत भोगले कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ-मालवणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत भोगले कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना आर्थिक मदत देण्यात आली.
गुरुवारी पहाटे घडलेल्या या आगीच्या दुर्घटनेत सुनील भोगले यांच्या राहत्या घरासह अंगणात उभी असलेली सहा वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत घरातील साहित्य आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे भोगले कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच वैभव नाईक यांनी भोगलेवाडी येथे जाऊन नुकसानग्रस्त घराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सुनील भोगले आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. संकटाच्या काळात भोगले कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देत पक्षाच्या वतीने मदतीचा हात पुढे केला.
या मदतीबद्दल भोगले कुटुंबीयांनी वैभव नाईक आणि उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी मालवण तालुका संपर्कप्रमुख दादा आंगणे, पंचायत समिती समन्वयक संतोष अमरे, मसुरे विभागप्रमुख अमोल वस्त, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत, पोईप विभागप्रमुख विजय पालव, कांदळगाव शाखाप्रमुख बाबली कांदळगावकर, सुजल भोगले, सुनील पालव, भावेश पालव, सचिन पालव, भाई माधव आदी उपस्थित होते.










