पत्नी आणि एक वर्षाच्या चिमुकल्या मुलीला मुंबईत ठेवून निघाले, पण पुन्हा घरी परतलेच नाहीत; आडवली परिसरात शोककळा
मालवण (प्रतिनिधी) : पत्नी आणि एक वर्षाच्या चिमुकल्या मुलीसोबत दिवाळी आणि भाऊबीजेचा सण आनंदात साजरा करून गावी परतणाऱ्या आडवली येथील तरुणावर काळाने घाला घातला. मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नजीक आंजणारी पुलावर शुक्रवारी पहाटे ट्रक आणि खासगी लक्झरी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या रघुवीर उर्फ किरण बाळकृष्ण मसुरकर (वय ३५, रा. आडवली-तांबळवाडी) यांचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या दुर्दैवी निधनाने आडवली परिसरात शोककळा पसरली आहे.
किरण मसुरकर हे दिवाळी आणि भाऊबीजेचा सण साजरा करण्यासाठी पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह मुंबईला गेले होते. सणाचा आनंद लुटल्यानंतर पत्नी व मुलीला मुंबईतच ठेवून ते खासगी लक्झरी बसने मालवणच्या दिशेने गावी परतत होते. मात्र, शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास लांजा नजीक आंजणारी पुलावर त्यांच्या बसची सोळाचाकी ट्रकशी जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांतील चालकांसह २६ हून अधिक प्रवासी जखमी झाले. यामध्ये किरण मसुरकर यांना गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे ठरले. शनिवारी सकाळी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. दिवाळीचा आनंद साजरा करून कुटुंबीयांकडे परतणाऱ्या किरण यांचा प्रवास अशा प्रकारे संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री आडवली येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक वर्षाची मुलगी, आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी निधनाने मसुरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आडवली गावावर शोककळा पसरली आहे.










