जाबुवंतापासून खलनायकापर्यंत प्रत्येक भूमिकेत जीव ओतणारा अवलिया हरपला; कोकणच्या लोककलेचा एक समर्थ अध्याय संपला
मालवण (प्रतिनिधी) :
दशावताराच्या रंगमंचावर जेव्हा एखादा कलाकार उभा राहतो, तेव्हा तो केवळ एखादी भूमिका साकारत नसतो, तर शेकडो वर्षांची लोकपरंपरा आपल्या अभिनयातून जिवंत करत असतो. पात्र कोणतेही असो, त्याचा चेहरा, त्याची देहबोली, संवादफेक आणि अभिनयातील सहजता यांतून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद फार थोड्या कलाकारांमध्ये असते. अशाच असामान्य कलाकारांपैकी एक असलेले देवबागचे ज्येष्ठ दशावतारी कलावंत महादेव सहदेव तथा सर्वपरिचित जीजी चोडणेकर यांचे निधन झाले आणि कोकणच्या दशावतार रंगभूमीवरील एक समर्थ पर्व काळाच्या पडद्याआड गेले.
वयाच्या ८१ व्या वर्षी आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच दशावतार नाट्यसृष्टीसह कोकणच्या कलाविश्वावर शोककळा पसरली. उद्या देवबाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सहा दशकांची रंगसेवा… अभिनयाचा विलक्षण ठसा!
दशावतार ही केवळ मनोरंजनाची कला नाही. ती कोकणच्या सांस्कृतिक जगण्याचा अविभाज्य भाग आहे. या कलेत कलाकाराला रंगमंचावर क्षणात अनेक भावविश्वे उभी करावी लागतात. पौराणिक पात्रांचा आविष्कार करताना त्यातील गांभीर्य, सामर्थ्य, आवेश आणि भावनांचे पदर अभिनयातून उलगडावे लागतात. जीजी चोडणेकर यांनी तब्बल सहा दशके याच कलेची निष्ठेने सेवा केली.
त्यांच्या अभिनयाची खरी ताकद होती ती व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरण्याची! जाबुवंतासारखी प्रभावी पौराणिक भूमिका असो किंवा खलनायकी भूमिकेतील आवेश आणि धाक असो, जीजी प्रत्येक पात्राला स्वतःची स्वतंत्र ओळख देत. त्यांच्या संवादफेकीतला भारदस्तपणा, देहबोलीतील सहजता आणि प्रसंगानुरूप अभिनयातील ताकद यामुळे त्यांच्या भूमिका रसिकांच्या स्मरणात कायम राहिल्या.
दशावताराच्या फडात कलाकार घडतो तो अनुभवातून, रंगभूमीशी असलेल्या निष्ठेतून आणि प्रेक्षकांच्या प्रेमातून. जीजींच्या सहा दशकांच्या कलाप्रवासात या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम पाहायला मिळाला. त्यांनी साकारलेल्या भूमिका केवळ त्या त्या प्रयोगापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर दशावतारप्रेमींच्या आठवणींचा भाग बनल्या.
पुरस्कारांनी गौरवलेल्या कलासाधनेचा सन्मान!
जीजींच्या अभिनयाची दखल विविध स्तरांवर घेतली गेली. त्यांच्या दशावतार कलेतील योगदानाबद्दल त्यांना झी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझा लोकराजा महोत्सवातही त्यांच्या कलासेवेचा गौरव करण्यात आला. २०२० मध्ये त्यांना राज्यस्तरीय सिंधुरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या प्रदीर्घ कलासाधनेची आणि दशावतार रंगभूमीवरील योगदानाची पावतीच होती.
मात्र, कोणत्याही कलाकारासाठी खरा पुरस्कार असतो तो रसिकांच्या मनात मिळालेलं स्थान! जीजींनी आपल्या अभिनयातून ते स्थान निर्माण केले होते. म्हणूनच त्यांचे जाणे ही केवळ एका ज्येष्ठ कलाकाराची एक्झिट नाही, तर दशावताराच्या एका समृद्ध अनुभवविश्वाचा निरोप आहे.
आज त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.या ज्येष्ठ कलावंताला कोकणशक्ती डिजीटल परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली!











