आमदार नीलेश राणे यांच्या पुढाकारातून काम मार्गी; नाम फाउंडेशनकडून होणार गाळ उपसा, जलसाठा वाढण्याची अपेक्षा
मालवण (प्रतिनिधी) : आचरा–पारवाडी परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळाच्या समस्येवर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. आमदार नीलेश राणे यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नांतून नदीपात्रातील गाळ उपशाच्या कामाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. आचरा गावचे सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीला प्रत्यक्ष कृतीचे स्वरूप मिळाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
आचरा–पारवाडी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर तसेच पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत होता. विशेषतः उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि शेती-बागायतीसमोरील पाण्याची समस्या लक्षात घेता नदीपात्रातील गाळ काढण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
या प्रश्नाची दखल घेत आमदार नीलेश राणे यांनी यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या वेळी गाळ उपशाच्या कामासाठी नाम फाउंडेशनला वर्कऑर्डर देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानुसार आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
गाळ उपशासोबत कच्च्या बंधाऱ्याचेही नियोजन
नदीपात्रातील गाळ काढल्यामुळे पाण्याचा प्रवाह अधिक सुरळीत होण्यासह नदीची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. याशिवाय आचरा–पारवाडी नदीवर कच्चा बंधारा उभारण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. या माध्यमातून समुद्राकडे वाहून जाणारे गोडे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करण्याचे नियोजन आहे.
गाळ उपसा आणि कच्च्या बंधाऱ्याची उभारणी या दोन्ही उपाययोजना प्रत्यक्षात आल्यास परिसरातील जलसुरक्षेला बळकटी मिळण्याबरोबरच शेती, बागायती आणि भूजल पातळी सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आचरा–पारवाडी परिसरासाठी हे काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या शुभारंभप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, संतोष कोदे, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, चंदू कदम, श्रुती सावंत, अनुष्का गावकर, पूर्वा तारी, बाबू परुळेकर, अभय भोसले, गुरु कांबळी, उमेश सावंत यांच्यासह पारवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर आता प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे. गाळ उपशाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण झाल्यास आगामी उन्हाळ्यात परिसरातील पाणी उपलब्धतेच्या दृष्टीने त्याचा लाभ मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












