वीज ग्राहकांच्या समस्या मांडण्यासाठी महावितरणकडून थेट संवादाची संधी
मालवण (प्रतिनिधी) : वीज ग्राहकांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी आणि ग्राहक व महावितरण प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी मालवण येथे तालुकास्तरीय ऊर्जा मित्र बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मालवण येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयात ही बैठक होणार आहे. तालुक्यातील तक्रारदार वीज ग्राहकांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, मालवण शाखेने केले आहे.
या बैठकीत वीजपुरवठ्यातील अडचणी, वाढीव वीजबिले, बिलिंगमधील त्रुटी, मीटर दुरुस्ती व बदल, वीज खांब आणि तारांची दुरुस्ती किंवा बदल तसेच प्रलंबित वीजविषयक तक्रारींच्या निराकरणाबाबत चर्चा होणार आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून ग्राहकांना आपल्या समस्या मांडता येणार आहेत.
वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, वीज वितरण सेवा अधिक पारदर्शक बनवणे आणि ग्राहकांमध्ये वीजविषयक जनजागृती वाढवणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्राहकांनी आपल्या तक्रारी, सूचना आणि अभिप्रायांसह बैठकीला उपस्थित राहावे. तक्रारींच्या अनुषंगाने आवश्यक अर्ज व संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, मालवण शाखेचे अध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर (९४२२०५५०७५), सचिव नीळकंठ मालणकर, संघटक नितीन वाळके आणि वफा खान यांच्याशी संपर्क साधावा, असेही शाखेच्या वतीने कळविण्यात आले आहे.











