मत्स्यव्यवसाय विभागाची १५ दिवसांत दुसरी मोठी कारवाई; आचरा ते देवगड समुद्रात थरारक पाठलाग
मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. आचरा किनाऱ्यासमोरील समुद्रात विनापरवाना ट्रॉलिंग करणाऱ्या कर्नाटकातील मलप्पे बंदराच्या ‘हनुमा ध्याना’ या हायस्पीड ट्रॉलर नौकेचा पाठलाग करून विभागाच्या पथकाने तिला देवगडसमोर पकडले. नौकेसह तांडेल आणि सात खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या १५ दिवसांतील मत्स्यव्यवसाय विभागाची ही दुसरी मोठी कारवाई आहे.
१८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाला आचरा किनाऱ्यासमोरील महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात ही नौका विनापरवाना ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. गस्ती नौका दिसताच संबंधित ट्रॉलरने वेगाने पळ काढला. मात्र, विभागाच्या पथकाने तिचा पाठलाग सुरू ठेवत देवगडसमोरील समुद्रात तिला पकडण्यात यश मिळवले. त्यानंतर ही नौका देवगड बंदरात आणून जप्त करण्यात आली.
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील सुनील शेखर कोट्यान यांच्या मालकीची ही नौका असून तिचा नोंदणी क्रमांक IND-KA-02-MM-6013 असा आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ आणि सुधारित अधिनियम २०२१ अंतर्गत नौकेविरोधात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, मालवण आणि देवगड परिसरातील स्थानिक मच्छिमारांनी परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर नौकांकडून होणाऱ्या बेकायदा मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाने सागरी गस्त वाढवत बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनीही या प्रश्नावर कठोर भूमिका घेतली आहे.
जिल्हा अंमलबजावणी अधिकारी प्रतीक महाडवाला यांच्या नेतृत्वाखाली ‘शीतल’ गस्ती नौकेद्वारे ही मोहीम राबविण्यात आली. सागरी सुरक्षा रक्षक दिवाकर जुवाटकर, संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर आणि स्वप्नील सावजी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.
रात्रीच्या अंधारात वेगाने पळणाऱ्या हायस्पीड ट्रॉलरचा पाठलाग करून तिला पकडण्यात विभागाला यश आले आहे. या कारवाईमुळे स्थानिक मच्छिमारांमधून समाधान व्यक्त होत असून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार मत्स्यव्यवसाय विभागाने व्यक्त केला आहे.












