मालवण (प्रतिनिधी)
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या उल्लेखावरून सुरू असलेल्या राजकीय वादातून निषेध व्यक्त करताना शिंदे शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्या हातून थेट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा मालवण येथील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखाप्रमुख सौ. पूजा जोगी यांनी तीव्र निषेध व्यक्त करत बाळासाहेबांचा फोटो फाडणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे म्हटले आहे.
सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्डिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रातील सावरकर यांच्याविषयीच्या उल्लेखावरून शिवसेना शिंदे गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पुस्तकाची पाने फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरे यांची छबी असलेला फोटोही फाडला गेला. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना पूजा जोगी यांनी, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडणे ही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे, असे म्हटले. सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण करताना बाळासाहेबांचा अवमान होणे ही शिंदे गटाची बेजबाबदार वृत्ती दर्शवणारी घटना आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनीच त्यांच्या प्रतिमेचा मान राखला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.











