मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या, १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत महत्त्वाचे खुलासे करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेच्या निमंत्रणासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरवर एका मफलरधारी व्यक्तीचं चित्र असून, ‘अजितदादांच्या अपघातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे या मफलरधारी नेत्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर अपघाताच्या कारणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. रोहित पवार यांनीही सुरुवातीपासून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. विमानाची तांत्रिक स्थिती, विमान कंपनीची भूमिका, उड्डाणाशी संबंधित प्रक्रिया आणि तपासातील संभाव्य त्रुटी यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता असल्याचा संशयही रोहित पवार यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. मात्र, घातपाताचा कोणताही निष्कर्ष अद्याप अधिकृत तपासातून सिद्ध झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील अंतिम तपास अहवालाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत रोहित पवार कोणते नवे पुरावे समोर ठेवतात, तपासातील कोणत्या बाबींवर प्रश्न उपस्थित करतात आणि पोस्टरवरील मफलरधारी व्यक्तीचा नेमका संदर्भ काय आहे, हे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांचा आरोप आहे का, याबाबतही उत्सुकता आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद
रोहित पवार यांची ही पत्रकार परिषद उद्या, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार आहे. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत नव्या बाबी समोर येणार का, कोणत्या व्यक्ती किंवा यंत्रणांवर प्रश्न उपस्थित होणार आणि या आरोपांना सत्ताधारी पक्षाकडून काय उत्तर दिलं जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा तपास आणि त्याभोवती निर्माण झालेले प्रश्न आता पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. उद्याच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार नेमकं काय बोलतात, यावर या प्रकरणातील पुढील राजकीय घडामोडींची दिशा ठरणार आहे.











