७० फूट लांब आणि ६० फूट रुंद मानचित्रातून संविधानिक मूल्ये, देशप्रेम आणि एकतेचा संदेश
मालवण (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण आणि संविधानिक मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये रुजवण करण्याच्या उद्देशाने संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा भव्य नकाशा साकारत संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तब्बल ७० फूट लांबी आणि ६० फूट रुंदीच्या या मानचित्रातून विद्यार्थ्यांनी देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानाविषयी जागरूकतेचा संदेश दिला.
भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आले. संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांच्या प्रेरणेतून हा अभिनव उपक्रम साकारण्यात आला. कलाशिक्षक श्री. समीर चांदरकर आणि क्रीडा शिक्षक श्री. संजय पेंडूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक श्री. महेश भाट यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या उपक्रमाचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर आणि सर्व संचालक मंडळाने कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
मानवी साखळीतून साकारलेला भारताचा नकाशा हा विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे आणि कल्पकतेचे प्रतीक ठरला. संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता ती विद्यार्थ्यांच्या विचारांत आणि कृतीत रुजावीत, हाच या उपक्रमामागील मुख्य संदेश होता. देशाच्या नकाशातून विद्यार्थ्यांनी संविधानाचा सन्मान करत राष्ट्रीय एकात्मतेचा जागर घडविला.











