श्री देव रवळनाथाचा गावपळणीसाठी कौल; गुरेढोरे, कुटुंबकबिल्यासह ग्रामस्थ जाणार गावाबाहेर
मालवण (प्रतिनिधी) : शेकडो वर्षांची परंपरा आणि श्रद्धेचा अनोखा वारसा जपणारे मालवण तालुक्यातील चिंदर गाव पुन्हा एकदा ऐतिहासिक गावपळणीसाठी सज्ज झाले आहे. श्री देव रवळनाथाच्या कौलाने गावपळणीचा मुहूर्त निश्चित झाला असून, येत्या २ डिसेंबर २०२६ पासून या अनोख्या परंपरेला सुरुवात होणार आहे. तब्बल साडेसात हजार लोकसंख्या असलेले संपूर्ण चिंदर गाव तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी निर्मनुष्य होणार आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व ग्रामस्थ गुरेढोरे आणि संसारोपयोगी साहित्यासह गावाची वेस ओलांडून बाहेर मुक्कामाला जाणार आहेत.
चिंदरवासीयांची उत्सुकता लागून राहिलेल्या या गावपळणीचा मुहूर्त त्रिपुरारी पौर्णिमेनंतर निश्चित करण्यात आला. बारापाच मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री देव रवळनाथाचा कौल-प्रसाद घेण्यात आला. देवाने गावपळणीसाठी कौल दिल्यानंतर प्रथेप्रमाणे २ डिसेंबरपासून गावपळणीला सुरुवात करण्याचे निश्चित झाले. दर तीन वर्षांनी होणाऱ्या या गावपळणीसाठी ग्रामस्थांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
गावपळणीचे वैशिष्ट्य म्हणजे या काळात संपूर्ण गावच स्थलांतरित होते. घरातील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण आपल्या गुरेढोऱ्यांसह, कुत्रे, मांजरे, कोंबड्या आणि संसारोपयोगी साहित्य घेऊन गावाबाहेर पडतो. आचरा, त्रिंबक, मसुरे, वायंगणी, बांदिवडे आदी परिसरांत गावाच्या हद्दीबाहेर तात्पुरत्या राहुट्या उभारून ग्रामस्थ तीन दिवस वास्तव्यास राहतात. या परंपरेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदू बांधवांप्रमाणेच ख्रिश्चन समाजातील ग्रामस्थही या गावपळणीत तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे गावपळण ही केवळ धार्मिक परंपरा न राहता सामाजिक एकात्मतेचेही प्रतीक ठरली आहे.
गावपळणीचे तीन दिवस म्हणजे चिंदरवासीयांसाठी एक वेगळेच विश्व असते. दैनंदिन धावपळ, व्यवसाय आणि कामकाजातून काही काळ मुक्त होत ग्रामस्थ निसर्गाच्या सान्निध्यात एकत्रित वेळ घालवतात. राहुट्यांमधील मुक्काम, संगीत, भजने, गप्पागोष्टी आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम यामुळे या दिवसांना उत्सवी स्वरूप प्राप्त होते. गावाबाहेर राहण्याच्या या परंपरेतून ग्रामस्थांमधील परस्पर जिव्हाळा आणि सामाजिक सलोखाही अधिक दृढ होतो.
श्रद्धा, देवावरील विश्वास, गावाची सामूहिक भावना आणि पिढ्यान्पिढ्या जपलेली परंपरा यांचा अनोखा संगम असलेली चिंदरची गावपळण कोकणच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांमध्ये विशेष स्थान राखते. आधुनिकतेच्या वेगवान प्रवाहातही शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात आहे. त्यामुळे २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या ऐतिहासिक गावपळणीकडे संपूर्ण चिंदरवासीयांचे लक्ष लागले आहे.











