जिल्हा परिषदचे माजी सभापती, एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष; ‘एसटी काका’ म्हणून होते परिचित
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी शिक्षण, आरोग्य व बांधकाम सभापती, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष तसेच मराठा समाजाचे नेते शशिकांत तुकाराम सावंत उर्फ एस. टी. सावंत (८०) यांचे रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गातील राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
एस. टी. सावंत हे जिल्हाभरात ‘एसटी काका’ या नावाने परिचित होते. मूळचे फोंडाघाट येथील असलेले सावंत गेल्या अनेक वर्षांपासून जाणवली येथे स्थायिक झाले होते. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी दोन वेळा काम पाहिले. याच काळात शिक्षण, आरोग्य आणि बांधकाम या महत्त्वाच्या विभागांचे सभापती म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत एस. टी. सावंत यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. पक्षासाठी अत्यंत प्रतिकूल आणि कठीण काळात त्यांनी निष्ठेने काम करत संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. एसटी कामगार सेनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या प्रश्नांसाठीही सातत्याने आवाज उठविला.
मनमिळाऊ आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या स्वभावामुळे त्यांचा जिल्हाभरात मोठा मित्रपरिवार होता. राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही ते सक्रिय होते. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांमध्ये त्यांनी पुढाकार घेत समाजासाठी योगदान दिले.











