पोईप (वार्ताहर) : वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील काळसे येथील श्री. शिवाजी विद्यामंदिर आणि जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निसर्ग अभ्यासभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले. वर्गातील अभ्यासाला प्रत्यक्ष निसर्ग निरीक्षणाची जोड देत विद्यार्थ्यांना वन्यजीव, पक्षी आणि जैवविविधतेचा अनुभव घेण्याची संधी या उपक्रमातून मिळाली.
या निसर्ग भ्रमंतीदरम्यान कुडाळ वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणाच्या संतुलनाचे महत्त्व समजावून सांगितले. वन्यजीव हा निसर्गाचा महत्त्वाचा घटक असून निसर्गचक्रामध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे वन्यजीवांचे रक्षण म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण होय, असे त्यांनी सांगितले.
धामापूर तलाव व परिसरात विद्यार्थ्यांनी विविध पक्षी, वनस्पती, जैवविविधता तसेच वन्यजीवांचा अधिवास यांचे निरीक्षण केले. यावेळी वनपाल सदानंद परब यांनी परिसरातील जैवविविधतेबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच सम्यंतक संस्थेचे सदस्य महंमद शेख यांनी पक्षी निरीक्षण आणि वन्यजीवांविषयी मार्गदर्शन केले.
प्रत्यक्ष निरीक्षण, निसर्गाशी संवाद आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक संकल्पना समजून घेण्याबरोबरच वन्यजीव संवर्धनाची जबाबदारीही जाणून घेता आली. अभ्यासक्रमातील पर्यावरण विषयाला अनुभवाधारित शिक्षणाची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला.
या उपक्रमास वनरक्षक अतुल खोत (धामापूर), वनरक्षक लक्ष्मण आम्ले (कांदळगाव), प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. परब, शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी, सम्यंतक संस्थेचे सदस्य तसेच मालवण व कुडाळ येथील आरआरटी पथकाचे सदस्य उपस्थित होते.










