मालवण (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागात पंचनामे करताना केवळ नुकसानीची नोंद न करता भविष्यातील जलसंधारणाच्या दृष्टीने वनराई बंधारे उभारता येतील अशा ठिकाणांची माहिती संकलित करण्याचे निर्देश मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी दिले आहेत.
याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच कृषी सहाय्यकांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. पीक पंचनाम्याची कार्यवाही करताना संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पंचनामा करताना संबंधित क्षेत्रातील स्थानिक नागरिक, शेतकरी, ग्रामस्थ तसेच संबंधित व्यक्तींशी चर्चा करून गावातील पाण्याची उपलब्धता, पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह, नाल्यांची सद्यस्थिती आणि भौगोलिक परिस्थिती यांचा विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्थळ पाहणीदरम्यान वनराई बंधारे उभारणे शक्य असलेल्या ठिकाणांची माहिती संकलित करून त्याचा स्वतंत्र अहवाल तातडीने तहसील कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा शेतीसह स्थानिक जलस्रोतांसाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने ही कार्यवाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याला जलसंधारणाच्या नियोजनाची जोड देण्यात आल्याने भविष्यात गावनिहाय वनराई बंधारे उभारण्यासाठी संभाव्य ठिकाणांची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध होणार आहे. यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे, भूजल पातळी वाढविणे तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करणे शक्य होणार आहे.











