मालवण (प्रतिनिधी) : वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ललित पंचमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त श्री स्वामी समर्थ यांचे आदिशक्ती आदिमाया स्वरूपातील दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
उत्सवाची सुरुवात पहाटे ५ वाजता मंगलस्नानाने होणार असून सकाळी ७ वाजता नित्य आरती होईल. सकाळी ९ वाजता महिलांसाठी विशेष श्रीनगर कुमकुम अभिषेक व तीर्थप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी स्थानिक भजने होणार असून सायंकाळी ५ वाजता श्री स्वामी समर्थ सामुदायिक नामजप आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७ वाजता नित्य आरती होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता माऊली वारकरी दिंडी भजन मंडळ, मोरवे यांचे दिंडी भजन सादर होणार आहे. या कार्यक्रमात बुवा विनोद कांदळगावकर यांच्यासह पखवाजवादक गुरुनाथ कांदळगावकर सहभागी होणार आहेत.
या ललितोत्सवाचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच अन्नदान सेवेसाठी वस्तूरूपाने अथवा देणगीरूपाने मदत करू इच्छिणाऱ्या स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ मठ, वायंगणी येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.











