मालवण, दि. ४ (प्रतिनिधी) : “बालकांचे आरोग्य हे समाजाच्या भवितव्याशी जोडलेले आहे. बालकांना लहानपणापासूनच सकस व पौष्टिक आहार मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गरोदर आणि स्तनदा मातांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरात उपलब्ध असलेल्या स्थानिक भाज्या, कडधान्ये, फळे आणि इतर पौष्टिक पदार्थांचा दैनंदिन आहारात योग्य प्रमाणात समावेश करावा. स्थानिक आणि पारंपरिक आहारपद्धती आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात,” असे प्रतिपादन मालवणच्या सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी केले.
राष्ट्रीय पोषण माह अभियान आणि सेवा संकल्प महाअभियानांतर्गत मालवण तालुक्यातील काळसे येथील नमसवाडी अंगणवाडी केंद्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचा समारोप उत्साहात झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
अभियानाच्या निमित्ताने महिला व मातांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पौष्टिक आहारावर आधारित पाककला स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धेचा समावेश होता. या उपक्रमांच्या माध्यमातून पौष्टिक आहार, आरोग्यदायी जीवनशैली आणि कुपोषणमुक्त समाजाचा संदेश देण्यात आला.
यावेळी प्रज्ञा चव्हाण म्हणाल्या की, कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ शासनाच्या योजना पुरेशा नाहीत, तर या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आणि त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामपंचायत आणि महिलांचा सक्रिय सहभाग अभियान अधिक प्रभावी बनवतो. प्रत्येक कुटुंबाने आपल्या आहाराबाबत जागरूक राहून निरोगी पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा उद्देश बालकांमधील कुपोषण कमी करणे, गरोदर व स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा आहे. अभियानाच्या माध्यमातून महिलांमध्ये पोषण, आरोग्य आणि संतुलित आहाराबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी उलका हजारे, पर्यवेक्षिका भगत, ग्रामसेविका शेलटकर, ग्रामपंचायत सदस्य सुजाता परब, मोनिका म्हापणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अंगणवाडी सेविका वैशाली प्रभू आणि शांती महाजन यांनी केले.












