मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर पीकपाणी नोंद करण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयांकडे अर्ज करूनही त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीकपाणी नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयांकडे अर्ज सादर केले आहेत. मात्र, अर्ज करूनही नोंदी अद्याप झालेल्या नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पीकपाणी नोंद ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असून विविध शासकीय योजना, पीकविमा तसेच शेतीशी संबंधित कामांसाठी या नोंदींचा उपयोग होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज अनावश्यकपणे प्रलंबित ठेवू नयेत आणि संबंधित अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी सादर केलेले अर्ज संबंधित तलाठ्यांनी मंजूर करून पीकपाणी नोंदी अद्ययावत न केल्यास या प्रश्नावर तालुकास्तरावर मनसेच्या वतीने आवाज उठविण्यात येईल, असा इशारा मनसे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या पीकपाणी नोंदी वेळेत अद्ययावत करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.












