१४ वर्षांखालील मुलांच्या गटात बाजी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत वायरी-भूतनाथ येथील श्री रेकोबा हायस्कूलच्या संघाने १४ वर्षांखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले. या यशामुळे संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जीत लुडबे, केदार मसुरकर आणि चैतन्य आळवे यांनी चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग आणि मालवण क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चौके येथील भा. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत श्री रेकोबा हायस्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि विजेतेपदाला गवसणी घातली. आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही दमदार कामगिरी करण्यासाठी संघ सज्ज झाला आहे.
या यशस्वी संघाला प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्रीनाथ फणसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शालेय समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय खोचरे, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.












