‘तृतीयरत्न’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा असूड’सह शिवरायांच्या पोवाड्याचे अभिवाचन; तरुणांसाठी रोजगाराभिमुख साहित्य उपक्रमांचे आयोजन
मुंबई (प्रतिनिधी)
वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि नव्या पिढीमध्ये पुस्तकांविषयी आवड निर्माण करण्यासाठी राज्यभरात १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. मराठी भाषा विभागाने १० सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार, यंदाच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा जागर करण्यात येणार आहे. अभिवाचन, परिसंवाद, चर्चासत्रे, पुस्तक प्रदर्शने आणि रोजगाराभिमुख कार्यशाळांच्या माध्यमातून वाचन चळवळीला व्यापक स्वरूप देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. विशेषतः शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करणे, पुस्तकांशी नाते दृढ करणे आणि ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीला हातभार लावणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
महात्मा फुलेंच्या साहित्याचा विचारजागर
यंदाच्या उपक्रमात महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांना विशेष स्थान देण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘तृतीयरत्न’, ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथांसह छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या साहित्याचे अभिवाचन, त्यातील विचारांवर परिसंवाद आणि चर्चासत्रे तसेच पुस्तक प्रदर्शने यांमधून सामाजिक परिवर्तन, शिक्षण, समता आणि शेतकरी जीवनाशी संबंधित विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे.
विज्ञानापासून अवकाश विज्ञानापर्यंत वाचनाचा विस्तार
वाचन प्रेरणा दिनाचे कार्यक्रम केवळ ललित साहित्यापुरते मर्यादित न ठेवता विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, पर्यावरण, आरोग्य, संगणक आणि अवकाश विज्ञान यांसारख्या विषयांचाही समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे साहित्यवाचनासोबतच ज्ञानाच्या विविध क्षेत्रांतील पुस्तके आणि माहितीपर साहित्य वाचण्याची सवय विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
तरुणांसाठी लेखन आणि प्रकाशन क्षेत्रातील संधी
तरुणांना वाचन आणि लेखन चळवळीकडे आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक लेखन, अनुवाद लेखन, पुस्तकनिर्मिती व प्रकाशन प्रक्रिया, ई-बुक, स्व-प्रकाशन, युनिकोडचा वापर, ऑनलाइन पुस्तकविक्री आणि लेखक-प्रकाशक करार अशा विषयांवर रोजगाराभिमुख उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. याशिवाय संहिता लेखन, विश्वकोशविषयक माहिती, लघुपट आणि माहितीपट लेखन यांबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतून लेखन, प्रकाशन आणि आशयनिर्मितीच्या संधी तरुणांना समजावून देणे, हा या उपक्रमांचा महत्त्वाचा भाग असेल.
‘एक पुस्तक भेट’ उपक्रमातून वाचनाची साखळी
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येकाने मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला किमान एक पुस्तक भेट देऊन वाचनासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विविध संस्थांनी समाजमाध्यमांवर ‘मराठी वाचन कट्टा’ निर्माण करावा, आभासी किंवा प्रत्यक्ष साहित्य संमेलने आयोजित करावीत आणि विकिपीडियासारख्या माध्यमांवर मराठी लेखन वाढविण्यासाठी कार्यशाळा घ्याव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मंत्रालयीन विभाग, त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय व निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालये या उपक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यक्रम ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष पद्धतीने आयोजित करून त्यांची व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
दृकश्राव्य माध्यमांतूनही वाचनाचा संदेश
संकेतस्थळे, आकाशवाणी, दूरदर्शन, एफ.एम. रेडिओ, स्थानिक केबल नेटवर्क आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून वाचनाला प्रेरणा देणारे दृकश्राव्य संदेश प्रसारित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाचन प्रेरणा दिनाचा संदेश शाळा-महाविद्यालयांपुरता मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.












