‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’च्या सदस्यांचा पुढाकार; वायरी समुद्रकिनारी शंख-शिंपले आणि सागरी जीवनाची घेतली माहिती
मालवण (प्रतिनिधी) : लाटांचा स्पर्श, हातात घेतलेले शंख-शिंपले आणि सागरी जैवविविधतेची माहिती… अशा अनोख्या अनुभवातून रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, ठाणे यांच्या सारथी दिव्यांग सेंटरमधील अंध दिव्यांग मुलांनी मालवणचा समुद्र अनुभवला. मालवणमधील ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेच्या सदस्यांच्या सहकार्याने वायरी समुद्रकिनारी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
सारथी दिव्यांग सेंटरचा अंध दिव्यांग मुलांचा ऑर्केस्ट्रा ग्रुप संगीत कार्यक्रमासाठी सध्या मालवणमध्ये दाखल झाला आहे. या मुलांना समुद्राचा अनुभव घेता यावा आणि सागरी जैवविविधतेची माहिती मिळावी, या उद्देशाने वायरी येथील पर्यटन व्यावसायिक प्रशांत जोशी यांनी ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेशी संपर्क साधला. त्यानंतर संस्थेच्या सदस्यांनी मुलांसाठी समुद्रकिनारी विशेष उपक्रमाचे आयोजन केले.
यावेळी संस्थेच्या दुर्गा ठिगळे यांनी मुलांना समुद्रातील जैवविविधता, विविध प्रकारचे मासे, प्रवाळ, समुद्री वनस्पती, खडकाळ भाग आणि वाळूचे विविध रंग यांची माहिती दिली. मालवणच्या समुद्रातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याविषयीही त्यांनी मुलांना सांगितले. संस्थेचे सदस्य दर्शन वेंगुर्लेकर आणि अन्य सदस्यांनी मुलांच्या हातात शंख-शिंपले देऊन त्यांची वैशिष्ट्ये समजावून सांगितली.
समुद्राच्या लाटा पायांना स्पर्श करत असताना मुलांनी स्पर्शाच्या जाणीवेतून समुद्राचा अनुभव घेतला. समुद्रकिनाऱ्यावरील नैसर्गिक घटकांना स्पर्श करून सागरी पर्यावरणाविषयी जाणून घेण्याची संधी या उपक्रमातून मुलांना मिळाली. निसर्गाचा अनुभव प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या वेळी सारथी दिव्यांग सेंटरच्या ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या व्यवस्थापक सुप्रिया वराडकर, त्यांच्या सहाय्यक प्रिया करंजे, सुहास वराडकर, प्रशांत जोशी, पालक दुर्गा मोहिते, ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट’च्या अध्यक्षा मेगल डिसोजा, उपाध्यक्षा स्वाती पारकर, सदस्य दुर्गा ठिगळे, चारुशीला देऊलकर, कमल बांदकर, मनीषा पारकर, राहुल जाधव आणि भूषण मेतर उपस्थित होते.











