१८ ते ३० वयोगटातील तरुणांसाठी प्रशिक्षण; १ डिसेंबरपर्यंत नावनोंदणीची मुदत, १ हजार रुपये शुल्क
मालवण (प्रतिनिधी) : परदेशात रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या सिंधुदुर्गातील तरुणांसाठी जर्मन भाषा शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आणि स. का. पाटील कला, वाणिज्य व देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने एक महिन्याचा ऑनलाइन जर्मन भाषा फाउंडेशन कोर्स आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी १ डिसेंबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे.
जर्मनीमध्ये कुशल मनुष्यबळाची मागणी असून, जर्मन भाषेचे ज्ञान असलेल्या तरुणांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील तरुणांना जर्मन भाषेचे प्राथमिक ज्ञान मिळावे, त्यांच्यात संवाद कौशल्य विकसित व्हावे आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधींसाठी त्यांची तयारी व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या एक महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये जर्मन भाषेची लिपी, व्याकरण, भाषेची वैशिष्ट्ये, जर्मन संस्कृती, शिष्टाचार, संवाद कौशल्य, बोलण्यातील नम्रता आणि दैनंदिन संभाषणाचा सराव यावर विशेष भर दिला जाणार आहे. या कोर्ससाठी जर्मन भाषेचे पूर्वज्ञान असण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रशिक्षणासाठी एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
जर्मन भाषेवर प्रभुत्व असलेल्या आणि भाषाशास्त्राचा अभ्यास केलेल्या गार्गी राऊत या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. वय वर्षे १८ ते ३० या वयोगटातील दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत.
इच्छुकांनी १ डिसेंबर २०२६ पूर्वी महाविद्यालयात नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी प्राचार्य कैलास राबते (८३८१०२२५२९), प्रा. डॉ. उज्वला सामंत (९४२१२६१४३९), प्रा. डॉ. एम. आर. खोत (८७६७५८६२६९) आणि प्रा. डॉ. देविदास हारगिले (९४२११८९९०७) यांच्याशी संपर्क साधावा.












