अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना दिलासा; संपूर्ण अभ्यासक्रमासाठी पहिल्या वर्षाचा उत्पन्न दाखला ग्राह्य
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनांचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना समाज कल्याण विभागाने केली आहे. संबंधित अभ्यासक्रमाच्या पहिल्या शैक्षणिक वर्षात सादर केलेला उत्पन्न दाखला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी नव्याने उत्पन्न दाखला काढण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. यामध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनेचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये उत्पन्न दाखला महत्त्वाचा असतो.
मात्र, या योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रथम शैक्षणिक वर्षात सादर केलेला उत्पन्न दाखला पुढील संपूर्ण अभ्यासक्रमासाठी ग्राह्य धरला जातो. त्यामुळे प्रत्येक वर्षी उत्पन्न दाखला काढण्यासाठी होणारा वेळ, खर्च आणि प्रशासकीय प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना टाळता येणार आहे.
दरम्यान, शैक्षणिक संस्थांमधील शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे कर्मचारी आणि प्राचार्य यांनीही या नियमाबाबत जागरूक राहून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.










